Tuesday 21 June 2016

भारतीय रिझर्व्ह बँक


भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती आर्थिक संस्था आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँक देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व्ह बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण (मॉनेटरी पॉलिसी) आणि पतधोरण (क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.
संपूर्ण भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची २२ क्षेत्रीय कार्यालये आहेत  कार्यालये त्यात्या राज्यांच्या राजधानी ठिकाणी आहेत.
प्रमुख उद्देश:
* भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.
* वित्तीय प्रणालीचे विनियमन आणि पर्यवेक्षण करणे.
* भारताची गंगजळी राखणे
* भारताची आर्थिक स्थिती राखणे.
* भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.
इतिहास: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना हिल्टन यंग समितीच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ अन्वये १ एप्रिल १९३५ ला करण्यात आली. बँकेचे मुख्यालय पहिल्यापासूनच मुंबई येथे असून येथूनच बँकेचे प्रमुख कार्य चलते. या बँकेने ब्रम्हदेशाची मध्यवर्ती बँक म्हणून एप्रिल १९४७ तर पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून जून १९४८ पर्यंत काम पाहिले. सुरुवातीस बँकेची मालकी खाजगी हातांमध्ये होती. परंतु १९४९ पासून बँक पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची झाली.
गव्हर्नर: भारतीय नोटा चलन म्हणून योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकारतर्फे खात्री म्हणून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी करतात. सर ऑस्बर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी कार्यभार स्वीकारला ते ३० जून १९३७ पर्यंत गव्हर्नर पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटेवर त्यांची स्वाक्षरी नव्हती.
त्यानंतर सर जेम्स ब्रेड टेलर १ जुलै १९३७ ते १७ फेब्रुवारी १९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते, ते ११ ऑगस्ट १९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणूनही काम पाहिले.
सध्या रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असून त्यांचा पदभार सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे.

No comments:

Post a Comment